पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – दुचाकीवरून कट मारल्याचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कोयत्याने वार करून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. २१ जून) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास, देहूरोड येथील जितू पान टपरीसमोर घडली.
शशिकांत नागेश मासे (वय ४३, रा. पोर्टर चाळ, देहूरोड. मूळगाव- कोनापुरेचाळ, सोलापूर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३ अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा तुषार मासे व त्याचा मित्र अर्जुन भुंभक हे दुचाकीवर उभे होते. दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून कट मारल्याचा राग मनात धरून विधी संघर्षित बालकांनी तुषारला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यातील एकाने त्याच्या जवळील लाकडी मुठीच्या लोखंडी कोयत्याने तुषारवर वार केले, ज्यामध्ये तुषारच्या उजव्या हाताचा अंगठा पंजापासून वेगळा होऊन तो गंभीर जखमी झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
देहूरोड येथे तरुणावर कोयत्याने हल्ला, अंगठा तोडला
