ग्रीनफील्ड महामार्गाच्या सर्व्हिस रोडच्या कामाला वेग; वाढवण बंदर प्रकल्पासाठी महत्त्वाचा टप्पा

पालघर : देशातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाच्या सर्व्हिस रोडच्या कामाला पालघर जिल्ह्यात समाधानकारक सुरुवात झाली असून प्रकल्पाचे काम नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पुढे सरकत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या या प्रकल्पासाठी सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन करत काम सुरू असून, खारफुटी (मँग्रोव्ह) संदर्भातील आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर डहाणू तालुक्यातही सर्व्हिस रोडच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

ग्रीनफील्ड महामार्गासाठी जमिनीचे संपादन राष्ट्रीय महामार्ग कायदा, १९५६ मधील तरतुदींनुसार करण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त सक्षम प्राधिकरणांच्या माध्यमातून संपादनाची कार्यवाही सुरू आहे. डहाणू आणि पालघर तालुक्यातील एकूण २४ गावांमधील ६०४.७४ हेक्टर जमीन संपादनासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे.
यापैकी आतापर्यंत सुमारे २८६ हेक्टर जमिनीचा ताबा प्रशासनाने यशस्वीरीत्या प्राप्त केला आहे. डहाणू तालुक्यात १५७ हेक्टर तर पालघर तालुक्यात १२८ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून उर्वरित संपादन प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेदरम्यान सर्व कायदेशीर बाबींची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नोटिसा बजावणे, सुनावण्या घेणे, मालमत्तेची पडताळणी, नुकसानभरपाईचे मूल्यांकन आणि जमिनीचा ताबा घेणे या सर्व टप्प्यांमध्ये कायद्याने निर्धारित केलेल्या प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे. तसेच संबंधित जमीनधारक आणि इतर हितधारकांचे हित जपण्यासाठी नुकसानभरपाईचे वितरण आणि आवश्यक ठिकाणी न्यायालयात रक्कम जमा करण्याची कार्यवाहीही प्रभावीपणे पार पडली आहे.

पालघरमध्ये सर्व्हिस रोडच्या कामाची झालेली सुरुवात ही वाढवण बंदर प्रकल्पाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून महाराष्ट्रासह देशाच्या व्यापार आणि औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे.

स्थानिक नागरिक, जमीनधारक आणि सर्व संबंधित घटकांचा विचार करून विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत हा प्रकल्प कायदेशीर, पारदर्शक आणि लोकहिताच्या दृष्टीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. वाढवण बंदर आणि त्यास जोडणारा ग्रीनफील्ड महामार्ग हा भविष्यात महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *