मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे माटुंगा परिसरात भेट देत असताना एक अनपेक्षित घटना घडली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांच्या मागे उभे असलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे एक अधिकारी अचानक उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सुदैवाने या घटनेत अधिकाऱ्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. उपस्थित कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी तत्काळ मदत करत त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांकडून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी अंधेरी सबवे, मिलन सबवे, मालाड सबवे, विरा देसाई रोड यांसारख्या सखल भागांची पाहणी केली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांना सखल भागांमध्ये पाणी तुंबू नये आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. “बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली आहे. हा मुंबईकरांसाठी आनंदाचा क्षण आहे. पुढील चार ते पाच महिने पाऊस चांगला झाला पाहिजे. मुंबईकरांनी पावसाचा आनंद घ्यावा,” असे त्या म्हणाल्या.
मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
