Thane-भिवंडीत अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर छापा; ७५० व्यावसायिक सिलेंडर जप्त

ठाणे : अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने भिवंडीतील मिठपाडा, पारोळ रोड परिसरात धडक कारवाई करत अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती विभागाने दिली.

शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्यस्तरीय दक्षता पथकाने पारोळ रोडवरील दोन गाळ्यांवर छापेमारी केली. तपासणीदरम्यान कोणतीही वैध परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आल्याचे उघड झाले.

कारवाईदरम्यान ५ किलो वजनाचे ६५३ भरलेले सिलेंडर, ५ किलो वजनाचे ९२ रिकामे सिलेंडर तसेच १९ किलो वजनाचे ६ रिकामे सिलेंडर असा एकूण ७५० सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १२ लाख ८० हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी संबंधितांवर आवश्यक कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून, अवैध साठेबाजी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न, नागरी पुरवठा विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *