नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी ‘ब्रिक्स अंतरिक्ष अर्थव्यवस्था’ ही जागतिक विकासाची पुढील महत्त्वाची सीमा असल्याचे सांगत सदस्य देशांनी नवोपक्रम, गुंतवणूक, उद्योजकता आणि शाश्वत विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
बेंगळुरू येथे आयोजित ब्रिक्स देशांच्या अंतरिक्ष संस्थांच्या प्रमुखांच्या (HOSA) बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ब्रिक्स राष्ट्रांकडे जागतिक अंतरिक्ष अर्थव्यवस्थेत अग्रगण्य शक्ती बनण्याची मोठी क्षमता असल्याचे नमूद केले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, अंतरिक्ष क्षेत्रातील भविष्यातील प्रगती ही परस्पर सहकार्य, सामायिक नवोपक्रम आणि सामूहिक महत्त्वाकांक्षेवर अवलंबून असेल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे काम केल्यास जागतिक स्तरावर नवे मानदंड निर्माण करता येतील.
अंतरिक्ष तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ वैज्ञानिक संशोधनापुरता मर्यादित नसून कृषी, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन, दळणवळण आणि आर्थिक विकासासाठीही महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिक्स देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करून अंतरिक्ष क्षेत्रातील नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
