मुंबई(mumbai) : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी गैरवर्तन करत पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत असून, या घटनेचा मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशन (MCRA) ने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही पत्रकार खासदार संजय दीना पाटील यांच्याकडे प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले असता त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर संताप व्यक्त केला. यावेळी संबंधित पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारण्यासाठी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आक्षेपार्ह व अयोग्य भाषेचाही वापर केल्याचे समोर आले आहे.
या घटनेबाबत मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त करत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांशी अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे म्हटले आहे.
MCRA चे अध्यक्ष विशाल सिंह आणि सचिव बृजभान जैसवार यांनी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, पत्रकारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी संघटना कटिबद्ध असून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.
संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असून, लवकरच अधिकृत तक्रारपत्रही सादर करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट असून संबंधित प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
