पत्रकारांबाबतच्या कथित गैरवर्तनाचा निषेध; संजय दिना पाटील यांची जाहीर माफी होईपर्यंत शिवसेनेच्या बातम्यांवर News Beez चा बहिष्कार.

मुंबई : खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथित गैरवर्तन करून धमकी दिल्याच्या आरोपांनंतर माध्यम क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर News Beez पोर्टलने महत्त्वपूर्ण भूमिका जाहीर करत, संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कोणत्याही बातम्या आपल्या पोर्टलवर प्रसारित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

News Beez व्यवस्थापनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार हे चौथा स्तंभ मानले जातात. सत्ताधारी, विरोधक किंवा कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांकडून पत्रकारांना धमक्या देणे, अपमानास्पद भाषा वापरणे किंवा त्यांच्या प्रश्नांना हिंसक पद्धतीने प्रतिसाद देणे हे लोकशाही मूल्यांवर आघात करणारे आहे.

काही पत्रकार प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले असता खासदार संजय दिना पाटील यांनी संतप्त होत त्यांच्याशी अयोग्य भाषा वापरल्याचा तसेच पुन्हा प्रश्न विचारण्यासाठी आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून विविध पत्रकार संघटनांनीही या प्रकाराचा निषेध नोंदविला आहे.

News Beez ने स्पष्ट केले आहे की, ही भूमिका कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून पत्रकारितेच्या सन्मानासाठी आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर घेतलेली आहे. पत्रकारांवरील दबाव, धमक्या किंवा दडपशाही सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

“खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल पत्रकारांची जाहीर माफी मागावी आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची हमी द्यावी. तोपर्यंत शिवसेनेच्या कोणत्याही राजकीय कार्यक्रम, पत्रकार परिषद, निवेदने किंवा अन्य बातम्यांना News Beez पोर्टलवर स्थान दिले जाणार नाही,” असेही नमूद करण्यात आले आहे.

#JournalistSafety
#MediaRights
#NewsBeez
#SanjayDinaPatil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *