चोरीछुप्या गुटखा विक्रीचा नवा फंडा; ओळखीच्या ग्राहकांनाच ‘गुप्त’ पुरवठा बाजारात माल मिळत नसल्याचे कारण पुढे करून दर दुप्पट; कारवायांच्या धाकाने गुटखा माफियांनी बदलली विक्रीची पद्धत

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधित गुटख्याची उघड विक्री जवळपास बंद झाली असली, तरी त्यामागे काळाबाजाराची नवी साखळी तयार झाली आहे. ओळखीच्या ग्राहकांनाच चोरीछुप्या पद्धतीने गुटखा पुरविला जात आहे. बाजारात माल मिळत नसल्याचे कारण पुढे करून गुटखा आणि पानमसाल्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे बंदीचा सर्वाधिक फायदा आता काळाबाजार करणाऱ्यांनाच होत असल्याचे चित्र आहे.

पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे दुकानांवर उघडपणे गुटखा ठेवला जात नाही. मात्र, विक्री पूर्णपणे थांबलेली नाही. ठराविक ग्राहकांकडून मोबाईलवर संपर्क झाल्यानंतरच गुप्तपणे गुटखा उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी मध्यस्थांच्या माध्यमातूनही पुरवठा सुरू असल्याची चर्चा आहे.

कारवाईमुळे नवीन मालाची आवक कमी झाल्याचा दावा विक्रेते करत आहेत. याच कारणाचा आधार घेत गुटख्याचे दर दुप्पट करण्यात आले आहेत. पूर्वी सहज उपलब्ध होणाऱ्या गुटख्यासाठी आता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. टंचाईचे कारण सांगून काही विक्रेते भरमसाट नफा कमावत असल्याचे बोलले जात आहे.

शहरात वेळोवेळी लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त होत आहे. तरीही अनेक भागांत त्याचा पुरवठा सुरूच असल्याने तस्करीचे जाळे अद्याप सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. शेजारील राज्यांतून छुप्या मार्गाने गुटखा शहरात आणला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातही काही ठिकाणी गुटखा उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता, गुटखा पुरवठ्याच्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे.

काळाबाजार, गुप्त गोदामे आणि तस्करीच्या मार्गांवर एकाच वेळी मोठी मोहीम राबविल्याशिवाय गुटखा माफियांना आळा बसणार नाही, असे मत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *