उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणाला अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे म्हणाले, “टीईटीच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे.”
पेपरफुटीमुळे हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोरात कठोर कारवाई आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. दोषींना कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा संदेश त्यांनी दिला.
दरम्यान, टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.
