राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत देणारे वक्तव्य केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात असा एक नेता आहे, त्याच्याकडे छोटं पद आहे. जो मंत्री आहे, त्याला महाराष्ट्रात एक मोठं पद दिलं जाईल. तसेच जे सहा खासदार पलटी मारून पैसे घेऊन सत्तेत गेले, त्यातील एका खासदाराला मंत्रीपद मिळू शकतं.”
या वक्तव्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार, पदबदल आणि नव्या राजकीय समीकरणांबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, रोहित पवार यांनी कोणत्याही नेत्याचे नाव स्पष्टपणे घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यामागील नेमका संदर्भ काय, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमध्ये महाराष्ट्रातील काही खासदारांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, रोहित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.
