नागपूर : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सोमवारी नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, नागपूरकरांच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “मी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी कार्यभार स्वीकारला आहे. ऑरेंज सिटी आणि टायगर कॅपिटलमध्ये पहिल्यांदाच काम करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, ती मोठी जबाबदारी असून तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करेन.”
नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी असून हिवाळी अधिवेशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, वाढती लोकसंख्या आणि वेगाने विकसित होणारे शहरी स्वरूप यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील शहर मानले जाते. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणि नागरिकाभिमुख पोलीस व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.
विश्वास नांगरे पाटील हे आपल्या कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय कार्यशैलीसाठी ओळखले जातात. महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना त्यांनी संघटित गुन्हेगारी, दहशतवादविरोधी कारवाया, कायदा-सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे राज्यभरातील पोलीस दलासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक आढावा बैठक घेत शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.
