HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कारवाई; आरटीओच्या अनेक सेवाही होणार बंद

मुंबई : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची मुदत आज, ३० जून २०२६ रोजी संपत असून, १ जुलैपासून HSRP न बसविणाऱ्या वाहनधारकांविरोधात परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय अशा वाहनधारकांना आरटीओमधील अनेक महत्त्वाच्या सेवा देखील मिळणार नाहीत.

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांची मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदलांची नोंद तसेच इतर अनेक आरटीओ सेवा थांबविण्यात येणार आहेत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, ३० जूनपूर्वी HSRP बसविण्यासाठी अधिकृत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना तात्पुरता दिलासा देण्यात आला असून, त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.

HSRP बसविण्याचे काम राज्यात तीन झोनमध्ये विभागण्यात आले आहे. रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एफटीए HSRP सोल्यूशन्स प्रा. लि. या अधिकृत कंपन्यांकडे हे काम सोपविण्यात आले आहे.

शासनाने HSRP प्लेटसाठी अधिकृत शुल्कही निश्चित केले आहे. त्यानुसार दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये आणि हलकी तसेच मध्यम व अवजड मोटार वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी वगळून) शुल्क आकारले जाणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अंतर्गत पोलीस व परिवहन विभाग संयुक्त किंवा स्वतंत्रपणे कारवाई करणार आहेत. तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय विभागांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परिवहन विभागाचे सहआयुक्त शैलेश कामत यांनी वाहनधारकांनी विलंब न करता HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी, अन्यथा दंडासह विविध प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागेल, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *