अयोध्या : प्रभू श्रीराम मंदिरातील भाविकांनी दिलेल्या देणग्यांमधील पैशांच्या कथित चोरीप्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक असलेल्या लवकुश मिश्रा याच्या आर्थिक व्यवहारांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ १२ हजार रुपये मासिक वेतन असतानाही त्याने सुमारे २५ लाख रुपये किमतीचे घर उभारण्यास सुरुवात केल्याचे तपासात समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राम मंदिर ट्रस्टमध्ये नोकरीला लागल्यानंतर काही महिन्यांतच लवकुश मिश्रा याने अयोध्या-लखनौ महामार्गालगतच्या शहादतगंज-बनबीरपूर परिसरात पत्नी सुप्रिया मिश्रा यांच्या नावावर ८.८ लाख रुपयांना सुमारे १,००० चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता. या भूखंडावर सध्या दोन मजली घराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून वीजजोडणीचे काम सुरू आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, संबंधित मालमत्ता आणि बांधकामाची सध्याची बाजारातील किंमत सुमारे २५ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. याशिवाय आरोपीच्या घरातून सुमारे १२ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महिन्याला अवघे १२ हजार रुपये वेतन असलेल्या कर्मचाऱ्याकडे एवढी मोठी मालमत्ता आणि रोख रक्कम कशी आली, याचा तपास आता अधिक तीव्र करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती आणि मालमत्तेचे स्रोत यांची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असून, मंदिरातील आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा सर्वंकष तपास करत आहेत.
