Mumbai-संजय राऊतांवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात; राम मंदिर, महिला सुरक्षा आणि राजीनाम्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका

मुंबई(mumbai) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी जोरदार टीका केली. राम मंदिर, विकासनिधी, महिला सुरक्षा, नसरापूर बलात्कार प्रकरण आणि खासदारांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून त्यांनी राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

राम मंदिरासंदर्भात बोलताना नवनाथ बन म्हणाले की, प्रभू रामचंद्र आणि रामसेतूच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसची भूमिका संजय राऊत यांनी स्वीकारली आहे. राम मंदिर उभारणीबाबत राऊत यांनी पूर्वी आंदोलनाची खिल्ली उडवली होती, असा आरोप करत मंदिरासंदर्भातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू असल्याने त्याचा निकाल येण्यापूर्वी राजकीय आरोप करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, राऊत यांनी प्रभू रामचंद्रांपेक्षा रावणाचा पुळका घेतल्याची टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपाच्या १०५ आमदारांना विकासकामांसाठी निधी देण्यात आला नव्हता, असा आरोप करत बन म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातील विकासकामे ठप्प झाली होती. याच कारभारामुळे जनतेने महाविकास आघाडीला नाकारल्याचा दावाही त्यांनी केला.

नसरापूर बलात्कार प्रकरणातील दोषीला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया टीकेची असल्याचा आरोप करत, महिला सुरक्षेच्या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला असल्याचे बन यांनी म्हटले. स्वप्ना पाटकर प्रकरणाचाही उल्लेख करत त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.

खासदारांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही बन यांनी प्रतिउत्तर देताना, “एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांच्या पाठिंब्यावरच संजय राऊत राज्यसभेवर निवडून आले होते. त्यामुळे इतरांकडे राजीनाम्याची मागणी करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा,” असे म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत बन म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे ‘राष्ट्र प्रथम’ या भूमिकेतून काम करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाच खरी शिवसेना म्हणून कौल दिला असून, विनाकारण आरोप करण्याऐवजी विरोधकांनी जनादेशाचा स्वीकार करावा, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *