पिंपरी-चिंचवड : शहरातील दररोज १०० किलोहून अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि मोठ्या आस्थापनांचा ओला कचरा १ जुलैपासून उचलला जाणार नसल्याच्या महापालिकेच्या निर्णयावर अखेर प्रशासनाने माघार घेतली आहे. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने शहरातील लाखो सोसायटीधारकांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या कचरा निर्मिती करणाऱ्या आस्थापनांना त्यांच्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने कडक भूमिका घेतली होती. मात्र, अनेक सोसायट्यांकडे आवश्यक तांत्रिक सुविधा, आर्थिक तरतूद आणि मार्गदर्शन उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी १८ जून रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन दंडात्मक कारवाईला स्थगिती देण्याची आणि नागरिकांना आवश्यक कालावधी देण्याची मागणी केली होती. तसेच सर्व संबंधितांची संयुक्त बैठक घेऊन व्यावहारिक तोडगा काढण्याची सूचनाही केली होती.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की, नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन सध्या ओला कचरा उचलण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. पुढील धोरणात्मक निर्णय महापालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी आणि संबंधित घटकांशी चर्चा करूनच घेतला जाईल.
Pimpri-Chinchwad-कचरा प्रश्नावर महापालिकेची माघार; सोसायटीधारकांना मोठा दिलासा ओला कचरा उचलणे तूर्तास सुरूच राहणार; अंतिम निर्णय लोकप्रतिनिधींसोबत चर्चेनंतर
