पहिल्याच तिमाहीत ५२६ कोटींचा मालमत्ता कर जमा ४.४५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी भरला कर; ऑनलाइन भरण्याकडे नागरिकांचा मोठा कल

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत मालमत्ता कर वसुलीचा नवा विक्रम नोंदविला आहे. अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला असून, शहरातील ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. ही संख्या एकूण नोंदणीकृत मालमत्तांपैकी सुमारे ५९.८४ टक्के इतकी आहे.

महापालिकेकडे निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून ७ लाख ४४ हजार ६३० मालमत्तांची नोंद आहे. यंदा ३ लाख ४७ हजार ५६४ नागरिकांनी ऑनलाइन कर भरल्याने डिजिटल व्यवहारांनाही मोठी चालना मिळाली. महिला बचत गटांमार्फत घरपोच कर बिले वाटप, सोशल मीडियावर जनजागृती आणि एसएमएस मोहिमेमुळे करदात्यांचा प्रतिसाद वाढल्याचे प्रशासनाने सांगितले.

झोननिहाय वसुलीत वाकड विभागीय कार्यालयाने ७२.८७ कोटी रुपयांसह प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ थेरगाव, कस्पटे वस्ती, किवळे, चिखली आणि भोसरी झोनचा क्रमांक लागतो.

महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी करदात्यांचे आभार मानत, नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहर विकासाला मोठी गती मिळाल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे विक्रमी करसंकलन शक्य झाल्याचे नमूद केले. तर उपायुक्त सचिन पवार यांनी पुढील टप्प्यात मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची मोहीम राबविण्यात येणार असून, थकीत कर तातडीने भरण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *