‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’; आजपासून वारकऱ्यांसाठी ‘चरणसेवा’ उपक्रम सुरू ११ जिल्ह्यांतील ४०० सेवा केंद्रांवर १२ हजारांहून अधिक डॉक्टर व स्वयंसेवक सज्ज मोफत आरोग्यसेवा, फिजिओथेरपी आणि चरणसेवेचा लाभ

मुंबई :
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे ‘चरणसेवा’ उपक्रमाला आजपासून प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा, पायांची मालिश, फिजिओथेरपी आणि प्राथमिक उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक सेवेसाठी तैनात करण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाचा वापर करून चरणसेवा केली जाणार असून, गरज भासल्यास रुग्णवाहिका आणि पुढील उपचारांचीही सुविधा उपलब्ध असेल.

पालखी मार्गावर आठ आरोग्य जनजागृती रथांद्वारे विविध शासकीय आरोग्य योजना, स्वच्छता, संसर्गजन्य आजारांपासून बचाव आणि निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. गतवर्षी या उपक्रमातून १ लाख ७५ हजारांहून अधिक वारकऱ्यांना थेट आरोग्यसेवा मिळाली होती. यंदा अधिक व्यापक स्वरूपात सेवा देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *