पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्तांची मोठी फेररचना नव्या नियुक्त्यांनी प्रशासनाला नवी धार आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आदेश

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. शहराच्या आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. नव्याने बदलीवर आणि पदोन्नतीवर हजर झालेल्या अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात विविध विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय मंजूर झाल्यापासून शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी शहराचा संपूर्ण कारभार केवळ ८ सहाय्यक पोलीस आयुक्त सांभाळत होते. दोघांच्‍या बदलीनंतर आता नव्या १० अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे ही संख्या वाढून १६ झाली आहे.
निलेश विश्वासराव देशमुख यांची वाहतूक शाखेत नियुक्ती झाली आहे. सुदर्शन साईदास राठोड यांच्याकडे गुन्हे-१ शाखेची जबाबदारी दिली आहे. पदोन्नतीवर हजर झालेले सुनील पांडुरंग पंधरकर यांच्याकडे विशेष शाखेचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तसेच, शहरातील वाढत्या ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी रोहिणी ज्ञानदेव बाणकर यांची सायबर व आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशांत बाबासो ढोले यांच्याकडे पिंपरी विभागाची जबाबदारी सोपवली आहे. औद्योगिक पट्ट्यातील महाळुंगे विभागाचे प्रमुख म्हणून प्रिया देविदास ढमाळे काम पाहतील. सांगवी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून मनीषा विश्वंभर कदम यांची नियुक्ती झाली आहे.
नव्या नियुक्त्यांसोबतच काही अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्याही करण्यात आल्या आहेत. सचिन तुकाराम कदम यांची महाळुंगे विभागातून गुन्हे-२ शाखेत बदली झाली आहे. प्रवीण बाळासाहेब मोरे यांची गुन्हे-२ मधून देहूरोड विभागात रवानगी करण्यात आली आहे. आयटी हब असलेल्या हिंजवडी विभागाची सूत्रे आता विठ्ठल खंडुजी कुबडे यांच्याकडे असतील. या आदेशातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने हजर राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *