pimpri chinchwad-रावेतमध्ये डॉक्टर महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू; आत्महत्येची नोंद, सर्व शक्यतांचा पोलीस तपास

पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad):रावेतमध्ये डॉक्टर महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू; आत्महत्येची नोंद, सर्व शक्यतांचा पोलीस तपास.खासगी रुग्णालयातील डॉक्टरचा दुर्दैवी अंत; कारण अद्याप अस्पष्ट, कुटुंबीयांना माहिती.

रावेत परिसरातील एका निवासी सोसायटीत शुक्रवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्येची घटना असल्याची नोंद पोलिसांनी केली असून, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्व शक्यतांचा तपास रावेत पोलीस करीत आहेत.

मृत महिलेचे नाव डॉ. श्वेता रोकडे असे असून त्या मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील होत्या. त्या रावेत येथील सेलेस्टीयल सिटी सोसायटीमध्ये दोन मैत्रिणींसह भाड्याने राहत होत्या. तसेच थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास सेलेस्टीयल सिटी सोसायटीतील एका इमारतीवरून महिला खाली पडल्याची माहिती रावेत पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील डॉ. रोकडे यांना तत्काळ औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला. कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. मृत्यूमागील कारण अद्याप समोर आलेले नसून, वैयक्तिक, व्यावसायिक किंवा इतर कोणते कारण आहे का, याचा तपास केला जात आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर बाबींची पडताळणी करून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह रावेत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *