पिंपरी, दि. ३ (pimpri chinchwad) – बांधकाम साइटवर नवव्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक खाली पडल्याने एक कामगार जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ३ जुलै) रोजी सकाळी जाधववाडी येथे घडली.
वीरप्पा चिनोल (३९, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे जखमी कामगाराचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथे एक बांधकाम साइट सुरु आहे. नवव्या मजल्यावर भिंतींचे काम सुरु आहे. साइटवर सुरक्षा जाळी लावण्यात आली आहे. वीरप्पा हे याच बांधकाम साइटवर काम करत होते. शुक्रवारी सकाळी वीरप्पा बांधकाम साइटच्या जागेत ठेवलेल्या मोबाइल टॉयलेट मध्ये जात होते. त्यावेळी नवव्या मजल्यावरून सिमेंटचे ब्लॉक खाली पडले. ब्लॉकचे वजन जास्त असल्याने सुरक्षा जाळीतून हे ब्लॉक खाली पडले. काही ब्लॉक शेजारी असलेल्या इमारतीवर पडले. एका घराच्या गॅलरी मध्ये हे ब्लॉक पडले. तर काही ब्लॉक बांधकाम साइटच्या परिसरात पडले. खाली शौचालयात जात असलेल्या वीरप्पा यांच्या अंगावर एक ब्लॉक पडल्याने ते यात जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने इतर कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
pimpri chinchwad-नवव्या मजल्यावरून सिमेंट ब्लॉक पडल्याने कामगार जखमी
