प्रशिक्षणामुळे महसूल प्रशासन अधिक सक्षम होणार; नंदुरबारमध्ये सहा महिन्यांत ४०२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

नंदुरबार : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक, नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात आलेला सहा महिन्यांचा प्रशिक्षण उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या उपक्रमाअंतर्गत एकूण ४०२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना महसूल विषयक कायदे, कार्यालयीन कार्यपद्धती, डिजिटल प्रशासन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांच्या वापराबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी प्रशिक्षित कर्मचारी हेच सक्षम महसूल प्रशासनाचा भक्कम पाया असल्याचे सांगितले. “ज्ञान वाटल्याने वाढते. प्रत्येकाने सातत्याने शिकत राहिले पाहिजे, वाचनाची सवय जोपासली पाहिजे आणि बदलत्या काळानुसार स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

वीर बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी-गांगुर्डे, तहसीलदार पंकज पाटील, लेखाधिकारी संतोष पावले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा आढावा घेतल्यानंतर जिल्ह्यात बहुसंख्य कर्मचाऱ्यांना मूलभूत व पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण मिळाले नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने प्रशिक्षणावर विशेष भर देत जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत नऊ प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले.

या प्रशिक्षणात ७७ सहाय्यक महसूल अधिकारी, ९४ महसूल सहाय्यक, १९९ ग्राम महसूल अधिकारी आणि ३२ मंडळ अधिकारी सहभागी झाले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, मामलतदार न्यायालय अधिनियम, जमीनविषयक कायदे, महसूल वसुली, फेरफार प्रक्रिया, माहितीचा अधिकार, सेवा हमी कायदा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, ई-कार्यालय, ऑनलाइन प्रणाली तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर अशा विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी-गांगुर्डे यांनी प्रशिक्षणामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून पुढील टप्प्यात मंडळ अधिकाऱ्यांसाठीही विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या उपक्रमासाठी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे नियोजन सहाय्यक महसूल अधिकारी महेंद्र कदमबांडे, मंडळ अधिकारी अस्मिता सुर्यवंशी, महसूल सहाय्यक सागर आव्हाड आणि ग्राम महसूल अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी केले.

या प्रशिक्षणामुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिक ज्ञान अधिक सक्षम होणार असून नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *