नागपूर : महाराष्ट्रात परवान्याशिवाय सुरू असलेल्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने धडक कारवाई सुरू केली असून, नागपूरमध्ये राबविण्यात आलेल्या एका अनोख्या ‘स्टिंग ऑपरेशन’ची राज्यभर चर्चा सुरू आहे. अवघ्या २२ रुपयांची राईड बुक करून आरटीओ अधिकाऱ्याने स्वतः ग्राहकाची भूमिका साकारली आणि त्यातून बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा उघडकीस आणत कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात परवान्याशिवाय बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे सातत्याने येत होत्या. याची खातरजमा करण्यासाठी एका आरटीओ अधिकाऱ्याने मोबाईल अॅपद्वारे रॅपिडोची राईड बुक केली. चालक प्रवाशाला घेण्यासाठी आल्यानंतर अधिकाऱ्याने स्वतःची ओळख उघड करत वाहनाची तपासणी केली.
तपासादरम्यान संबंधित दुचाकी व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक परवान्याशिवाय चालवली जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या चालकांमध्ये आणि संबंधित कंपनीमध्ये खळबळ उडाली आहे.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, राज्य शासनाकडून अधिकृत धोरण आणि आवश्यक परवानगी मिळाल्याशिवाय कोणालाही व्यावसायिक स्वरूपात बाईक टॅक्सी सेवा चालवता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही अशाच पद्धतीने गुप्त कारवाया सुरू राहतील, असा इशाराही विभागाने दिला आहे.
या कारवाईनंतर बाईक टॅक्सी सेवांच्या कायदेशीरतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसह नियमबाह्य प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन कोणते पुढील धोरण जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
