नागपूर : भारताकडे संपूर्ण मानवजातीला योग्य दिशा दाखवण्याची क्षमता आहे. मात्र, हे नेतृत्व केवळ आर्थिक किंवा लष्करी सामर्थ्यावर नव्हे, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांच्या बळावरच शक्य आहे. भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगत प्रगती केली, तर तो सर्वोच्च गौरव आणि सर्वोच्च शक्ती असलेले राष्ट्र म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांचे जीवन, कार्य आणि समाजातील योगदान उलगडणाऱ्या यूट्यूब मालिकेतील १०० व्या भागाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संघाच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि समाजजीवनातील भूमिकेवर सविस्तर भाष्य केले.
मोहन भागवत म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय कोणत्याही राजकीय किंवा सत्ताकेंद्री उद्दिष्टांपुरते मर्यादित नसून, समाजात चारित्र्यवान, शिस्तप्रिय आणि निःस्वार्थी व्यक्तिमत्त्वांची निर्मिती करणे हेच संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. संघाच्या शाखांमधून स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी, शिस्त आणि सेवाभावाची जाणीव निर्माण केली जाते.
ते पुढे म्हणाले की, आज जगातील अनेक देश भारतीय संस्कृती आणि संघाच्या कार्यपद्धतीकडे उत्सुकतेने पाहत आहेत. स्वयंसेवक घडविण्याची संघाची पद्धत, समाजासाठी निःस्वार्थ सेवा आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली याविषयी जागतिक स्तरावरही उत्सुकता वाढत आहे.
भागवत यांनी यावेळी संघाच्या विविध आनुषंगिक संस्थांबाबतही भूमिका स्पष्ट केली. संघ प्रेरणा आणि वैचारिक दिशा देतो; मात्र प्रत्येक संस्था स्वतंत्रपणे कार्य करते. सर्व संस्थांचे दैनंदिन निर्णय किंवा कारभार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नियंत्रित केला जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतातील सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जतन आणि राष्ट्रीय पुनरुत्थानासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या मूल्यांशी निष्ठावान राहणे आवश्यक असल्याचे सांगत, भारताने जगासमोर मानवतेचा आदर्श ठेवण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.
