Pimpri-Chinchwad-पवना धरणाला वरुणराजाची जोरदार साथ; अवघ्या २४ तासांत जलसाठ्यात तब्बल ५.०५ टक्क्यांची भर

धरण परिसरात ९६ मिमी मुसळधार पाऊस; पाणीसाठा २३.९० टक्क्यांवर, शहराच्या पाणीपुरवठ्याला दिलासा

पिंपरी-चिंचवड :
गेल्या काही दिवसांपासून पवना धरणाच्या पाणीसाठ्याकडे चिंतेने पाहणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांना अखेर वरुणराजाने मोठा दिलासा दिला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात तब्बल ५.०५ टक्क्यांची भर पडली आहे. त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा २३.९० टक्क्यांवर पोहोचला आहे.

रविवार सकाळी ६ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार धरण परिसरात गेल्या चोविस तासांमध्ये ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या दमदार पावसामुळे डोंगरदऱ्यांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली असून, धरणाची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. जूनच्या सुरुवातीपासून आतापर्यंत धरण क्षेत्रात ४४० मिलिमीटर पाऊस झाला असून, या कालावधीत जलसाठ्यात एकूण ७.०५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मात्र, समाधानकारक पावसानंतरही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाची स्थिती अजूनही मागे आहे. ५ जुलै २०२५ रोजी पवना धरणात ७१.४८ टक्के पाणीसाठा होता, तर यंदा तो केवळ २३.९० टक्के आहे. त्यामुळे अजूनही मोठी तफावत कायम असून, सातत्याने दमदार पावसाची गरज असल्याचे जलतज्ज्ञांचे मत आहे.

हवामान विभागाने मावळ परिसरात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर पावसाचा हा वेग कायम राहिला, तर आगामी काही दिवसांत धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ होऊन पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *