झेनिथ धबधब्यावर थरार; अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात पर्यटक अडकले, ग्रामस्थांचे धाडसी रेस्क्यू

खोपोलीतील विहारी ठाकूरवाडीच्या ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने वाचविले जीव; पावसाळी पर्यटनात सावधगिरीचे आवाहन

खोपोली :
मुसळधार पावसामुळे खोपोलीतील प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर शनिवारी मोठा थरार अनुभवायला मिळाला. धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने अनेक पर्यटक मधोमध अडकून पडले. काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, विहारी ठाकूरवाडी येथील ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत धाडसी बचाव मोहीम राबविली आणि दोरीच्या साहाय्याने सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले.

शनिवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक झेनिथ धबधब्यावर आले होते. दरम्यान, डोंगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्यातील पाण्याची पातळी आणि वेग अचानक वाढला. त्यामुळे अनेक पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी परतता आले नाही आणि ते पाण्याच्या वेढ्यात अडकले.

घटनेची माहिती मिळताच विहारी ठाकूरवाडीतील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी कोणतीही भीती न बाळगता दोरीच्या साहाय्याने बचाव मोहीम सुरू केली. जोरदार प्रवाहाचा सामना करत ग्रामस्थांनी एकामागोमाग एक सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर आणले. त्यांच्या धाडसामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

या घटनेनंतर प्रशासनाने पावसाळ्यात धबधबे, ओढे आणि नदीपात्रांमध्ये उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. डोंगराळ भागात पाण्याचा प्रवाह काही क्षणांत वाढू शकतो. त्यामुळे सूचना फलकांचे पालन करावे, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा पाण्यात उतरण्याचा मोह टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

झेनिथ धबधब्यावर ग्रामस्थांनी दाखविलेल्या धाडसाचे आणि वेळेवर केलेल्या बचावकार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *