पवना धरणात २४ तासांत तब्बल १०.६४ टक्क्यांनी वाढ; मुसळधार पावसाने जलसाठ्यात मोठी भर २४ तासांत १९७ मिमी पाऊस; धरण ६५.७१ टक्के भरले, पावसाचा जोर कायम

मावळ :
पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अवघ्या एका दिवसात धरणाच्या जलसाठ्यात तब्बल १०.६४ टक्क्यांची भर पडली असून, सध्या धरण ६५.७१ टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांत १९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर १ जूनपासून आजपर्यंत एकूण १,४०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत असून, केवळ १ जूनपासून आतापर्यंत धरणातील पाणीसाठ्यात ४८.९१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

मात्र, मागील वर्षी याच दिवशी पवना धरणातील पाणीसाठा ७७.५४ टक्के होता. त्या तुलनेत यंदा जलसाठा अद्याप कमी असला, तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरण वेगाने भरत असल्याचे चित्र आहे.

हवामान खात्याने पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण प्रशासनाकडून जलसाठ्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार विसर्गाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *