पवना धरण वेगाने भरतेय!; २४ तासांत जलसाठ्यात आणखी ७.८९ टक्क्यांची भर ७४ मिमी पावसाची नोंद; धरणाचा पाणीसाठा ७३.६० टक्क्यांवर, शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दिलासादायक चित्र

मावळ –
पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून, गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात आणखी ७.८९ टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या धरण ७३.६० टक्के भरले असून, पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे.

गेल्या २४ तासांत धरण परिसरात ७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढत असून, १ जूनपासून आजपर्यंत एकूण १,४७९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या कालावधीत धरणातील जलसाठ्यात तब्बल ५६.८० टक्क्यांची वाढ झाली आहे.

मागील वर्षी याच दिवशी पवना धरणातील पाणीसाठा ७६.२२ टक्के होता. त्या तुलनेत यंदाचा साठा किंचित कमी असला, तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरण भरून निघण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसही पावसाचा अंदाज वर्तविल्याने धरणातील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण प्रशासनाकडून जलसाठ्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार विसर्गाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पवना धरण लवकरच पूर्ण क्षमतेकडे वाटचाल करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *