मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेवरून विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांचा “भाडे के टट्टू” असा उल्लेख केला. तसेच, पैसे घेऊन सोशल मीडियावर महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “अहंकार… फक्त आणि फक्त अहंकार,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
मिसिंग लिंक प्रकल्पातील दरड कोसळण्याची घटना, प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित होणारे प्रश्न आणि त्यावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता अंजली दमानिया यांच्या प्रतिक्रियेमुळे या वादाला आणखी नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
