वडिलांना शिवीगाळ का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कार मेकॅनिक तरुणाला आणि त्याच्या भावाला गॅरेजमध्ये तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच एका आरोपीने तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (८ जुलै) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राज ऑटो गॅरेज, तळवडे रोड, रुपीनगर येथे घडली.
या प्रकरणात तौसीफ अल्लाउद्दीन राईन (२२, निगडी पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इम्रान, शकील आणि मिथुन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ राज ऑटो गॅरेज येथे गेले होते. त्यांनी आरोपी मिथुन याला “तू माझ्या वडिलांना शिवीगाळ का केलीस” असे विचारले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी गॅरेजमध्ये असलेल्या इतर दोन आरोपींनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या दरम्यान एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात कपाळाच्या वर डाव्या बाजूला आणि डोळ्याच्या खाली कोयता मारून गंभीर दुखापत केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
—————–
कचऱ्याची बादली ठेवल्याच्या कारणावरून महिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
लॅबच्या पायऱ्यांजवळ कचऱ्याची बादली का ठेवली, असे म्हणून एका तरुणाने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिला खाली पडल्याने तिच्या पोटाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी (७ जुलै), सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास संकल्प लॅब, सद्गुरूनगर, भोसरी येथे घडली.
या प्रकरणात पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला लॅबमध्ये आपले काम करत असताना तिथल्या ओळखीच्या आरोपीने पायऱ्यांजवळ कचऱ्याची बादली ठेवल्याचा बहाणा करून वाद घातला. आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जोरात ढकलून दिले. यामुळे फिर्यादी जमिनीवर पडल्या आणि त्यांच्या पोटाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
—————–
दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी
रस्त्याच्या कडेने पायी चालत जात असलेल्या एका गॅरेज मालकाला पाठीमागून आलेल्या अज्ञात स्कुटी चालकाने जोरदार धडक दिली. या अपघातात गॅरेज मालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या उजव्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. ही घटना मंगळवारी (७ जुलै) रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ, विजयनगर, काळेवाडी येथे घडली.
या प्रकरणात अभिजीत राजू शिंगारे (३२, काळेवाडी पुणे) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात स्कुटी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेने पायी चालत जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात स्कुटी चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून फिर्यादी यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालक जखमीला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. या धडकेमुळे फिर्यादी यांच्या उजव्या मांडीच्या खुब्याला फ्रॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.
——————–
सोसायटीच्या पार्किंगमधून मिनी बस चोरीला
सोसायटीच्या आवारात लॉक करून पार्क करून ठेवलेली एक मिनी व्हॅन्स बस अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (८ जुलै) पहाटे ४ ते पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान ऐश्वर्यम सोसायटी, झव्हेरी कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.
या प्रकरणात मुस्ताक रज्जाक शेख (५०, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची फोर्स मोटार लिमिटेड कंपनीची मिनी व्हॅन्स बस रात्री नेहमीप्रमाणे सोसायटीच्या पार्किंगमध्ये लॉक करून उभी केली होती. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने या बसचे लॉक तोडून ती चोरून नेली. फिर्यादी यांनी सकाळी पाहिले असता बस चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
