Mumbai-पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा स्थापना दिन उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा स्थापना दिन मुंबईत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या विचारांना उजाळा देत त्यांचे कार्य आजही देशासाठी प्रेरणादायी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना शिक्षण, सन्मान, समान संधी आणि न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य संघर्ष केला. समताधिष्ठित भारताच्या निर्मितीसाठी त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि आत्मसन्मान देणारा भारत उभारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या प्रवाहात सहभागी झाल्यास ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पना प्रत्यक्षात साकार होतील, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तथा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो तसेच सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उद्योजक पद्मश्री डॉ. अशोक खाडे यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे प्रदान करण्यात येणारा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *