Mumbai-‘मालवणात भ्रष्टाचारामुळे शिवरायांचा पुतळा कोसळला, ती महाराष्ट्राची बदनामी नव्हती का?’ ; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई(mumbai) : मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावरील वाद अधिकच चिघळत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर टीका करण्याऐवजी सरकारने स्वतःच्या कारभाराचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला राऊत यांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले, मालवणात भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, ही महाराष्ट्राची बदनामी नव्हती का? तो एक भगतसिंह कोश्यारी म्हणून राज्यपाल होता. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली, त्यांचा अपमान केला आणि त्यावेळी तुम्ही त्याचे समर्थन करत होतात. ती महाराष्ट्राची बदनामी नव्हती का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारकडून मिसिंग लिंक प्रकल्पावरील टीकेला ‘महाराष्ट्राची बदनामी’ असे संबोधले जात असताना, राऊत यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमधील त्रुटींवर प्रश्न विचारणे हा लोकशाहीतील अधिकार असून, त्याला महाराष्ट्राचा अपमान म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी मालवणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचाही उल्लेख करत, त्या प्रकरणातील कथित भ्रष्टाचारावर सरकारला लक्ष्य केले. तसेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.

दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्प, दरड कोसळण्याच्या घटना आणि त्यावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *