सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर सोलापूरमधील नोबल हॉस्पिटलमध्ये प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई केली. सोलापूरचे सहायक आयुक्त अरुण गोडसे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसराची सखोल पाहणी केली. तपासादरम्यान रुग्णालयाशी संलग्न असलेल्या फातिमा फार्मसीचीही तपासणी करण्यात आली. या तपासणीत गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनाने केला आहे.
एफडीएच्या तपासणीत औषध विक्रीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक स्तरावर निदर्शनास आल्याने संबंधित फातिमा फार्मसीमधील औषध विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे रुग्णालय प्रशासनासह संबंधित मेडिकलमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून आढळलेल्या त्रुटींचा सविस्तर अहवाल तयार केला जात असून, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर औषध विक्री केंद्रे, रुग्णालये आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांवर नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, याची तपासणी सुरू केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा अथवा नियमभंग सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
