हेडलाईट बंद, तरी ८४ किमी प्रवास! मोबाईलच्या फ्लॅशलाईटवर धावली सरकारी बस; व्हिडिओ व्हायरल

बेंगळुरू | प्रतिनिधी

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (KKRTC) बसमधील निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बसची हेडलाईट अचानक बंद पडल्यानंतर चालकाने बस थांबवण्याऐवजी चक्क वाहकाच्या मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या उजेडात तब्बल ८४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या धोकादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ही घटना कलबुर्गी ते चिंचोळी या मार्गावर धावणाऱ्या कल्याण कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KKRTC) च्या बसमध्ये घडली. रात्रीच्या वेळी बसची हेडलाईट अचानक बंद पडली. अशा परिस्थितीत नियमानुसार बस थांबवून पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित असताना, चालकाने प्रवास सुरूच ठेवला. वाहकाने आपल्या मोबाईलचा फ्लॅश सुरू करून बसच्या पुढील बाजूस प्रकाश दिला आणि त्याच उजेडात चालकाने ८४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या संपूर्ण प्रकारामुळे बसमधील प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर KKRTC प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित बस चालकाला निलंबित करण्यात आले असून, चार्जमनवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच बसची देखभाल करण्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी संबंधित मेकॅनिकची सेवाही समाप्त करण्यात आली आहे. याशिवाय वाहकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून संपूर्ण घटनेची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या घटनेनंतर महामंडळाने जुन्या बसांची विशेष तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सर्व बसांच्या तांत्रिक स्थितीची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या आधारावर रात्रीच्या अंधारात बस चालवल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील निष्काळजीपणावर तीव्र टीका होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *