Maval-वीकेंडला पवना फिरायला जाणार? आधी ही बातमी वाचा! दुधिवरे खिंड वाहतुकीसाठी पूर्ण बंद

मावळ(maval) –वीकेंडला पवना फिरायला जाणार? आधी ही बातमी वाचा! दुधिवरे खिंड वाहतुकीसाठी पूर्ण बंद दरड कोसळण्याचा धोका; पिंपरी-चिंचवडकरांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

पावसाळ्यात पवना धरण, तिकोणा, तुंग, लोहगड, विसापूर आणि मावळ परिसरात फिरण्यासाठी जाणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पर्यटकांची सर्वाधिक वर्दळ असलेली दुधिवरे खिंड सुरक्षेच्या कारणास्तव पुढील आदेशापर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे खिंडीत दरड आणि मोठे दगड कोसळण्याचा धोका वाढल्याने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा निर्णय घेतला आहे.

पावसाळा सुरू होताच पवना धरण परिसरात दर शनिवार-रविवारी हजारो पर्यटक दाखल होतात. पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबई येथून येणाऱ्या पर्यटकांसाठी दुधिवरे खिंड हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, खिंडीतील धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने कोणताही जीवितहानीचा प्रसंग टाळण्यासाठी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.

दुधिवरे खिंड अत्यंत अरुंद असून दोन्ही बाजूंना उंच कडे आहेत. सततच्या पावसामुळे कड्यांवरील मोठे दगड सैल झाले आहेत. हे दगड केव्हाही रस्त्यावर कोसळू शकतात. याशिवाय खिंडीत संरक्षक जाळी बसविण्याचे कामही सुरू आहे. वाहतूक सुरू असल्याने या कामात अडथळे निर्माण होत होते. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुणे ग्रामीण पोलीस यांनी दिलेल्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले.

हे आहेत पर्यायी मार्ग

मुंबईकडून पवनानगरकडे जाणाऱ्यांसाठी
– लोणावळा – कुमार चौक – भुशी धरण – घूसळखांब – जवण – मुळशी – पवनानगर.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून जाणाऱ्यांसाठी
– सोमाटणे फाटा – कडधे – पवना धरण.
– कामशेत – खडकआळे – काळे कॉलनी – पवना धरण.
– चांदणी चौक – पौड फाटा – काशिग – जवण – पवनानगर.

प्रशासनाने पर्यटकांना बंदी असलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट आवाहन केले आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, दगड घसरणे आणि रस्त्यांवर चिखल साचणे यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे सुरक्षिततेला प्राधान्य देत केवळ प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, वीकेंडला पवना परिसरात जाण्याचा बेत आखणाऱ्या पर्यटकांनी घरातून निघण्यापूर्वी वाहतुकीची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवास करावा, असा सल्लाही प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *