पुनावळे ते किवळे रस्त्यावर पीएमपीएल बसने ओव्हरटेक करताना स्कुटीला धक्का दिल्याने स्कुटीवरील मुलगी बसच्या मागच्या चाकाखाली पडून तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (११ जुलै) सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास तुकाई नर्सरीजवळील सर्व्हिस रोडवर घडली.
खुशबू असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणात तिच्या आईने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक सय्यद शब्बीर मुलानी (३४, अंकुश चौक, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या स्कुटीवरून जात असताना समोरून येणाऱ्या पीएमपीएल बसच्या चालकाने हयगयीने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून एका गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसच्या मागच्या बाजूचा धक्का स्कुटीला लागल्याने फिर्यादीचा तोल गेला आणि त्यांची मुलगी खुशबू ही बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. रावेत पोलीस तपास करत आहेत.
