जेजुरी, पुणे : प्रतिनिधी
सासवड–जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे सांगत त्यांनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तीन वारकरी भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या अपघातात तीन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक वारकरी जखमी झाले आहेत. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
यावेळी त्यांनी अपघातातील मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीने पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येतील आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहने चालवून वारकऱ्यांच्या जीविताची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
