पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दहा प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड. प्रत्येक प्रभागातून एकच अर्ज दाखल; निवडणूक प्रक्रिया शांततेत पार
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दहा प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुका सोमवारी बिनविरोध पार पडल्या. प्रत्येक प्रभाग समितीसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (भा.प्र.से.) प्रजित नायर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. त्यांनी ‘अ’ राजगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी अर्चना करांडे, ‘ब’ सिंहगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी मंदार देशपांडे, ‘क’ विजयदुर्ग प्रभाग समितीच्या सभापतीपदी निखिल बोऱ्हाडे, ‘ड’ देवगिरी प्रभाग समितीच्या सभापतीपदी सविता खुळे, ‘इ’ शिवनेरी प्रभाग समितीच्या सभापतीपदी अर्चना सस्ते, ‘फ’ तोरणा प्रभाग समितीच्या सभापतीपदी शिवानी नरळे, ‘ग’ पुरंदर प्रभाग समितीच्या सभापतीपदी मनिषा पवार, ‘ह’ प्रतापगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी तृप्ती कांबळे, ‘ज’ रायगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी आरती चोंधे आणि ‘ल’ लोहगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी रेखा देवकर यांची अधिकृत घोषणा केली. निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नगरसचिव उल्हास जगताप, मुकेश कोळप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रभाग अधिकारी निवेदिता घार्गे, गोरक्षनाथ लिमण, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पूजा दूधनाळे, डी.डी. कांबळे, संतोष कोराड तसेच नगरसचिव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहिले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित प्रभाग समिती सभापतींनी महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर तसेच पदाधिकारी आणि नगरसदस्यांची भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारल्या.
