Mumbai-भारतीय वंशाच्या रिद्धी चौहानची अमेरिकेत ऐतिहासिक कामगिरी; ३०० नेव्ही कॅडेट्सच्या कमांडिंग ऑफिसरपदी निवड

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय वंशाच्या १७ वर्षीय रिद्धी चौहान हिने अमेरिकेत उल्लेखनीय यश संपादन करत नवा इतिहास रचला आहे. न्यूयॉर्कमधील बेंजामिन एन. कार्डोझो हायस्कूलच्या ‘नेव्ही ज्युनियर रिझर्व्ह ऑफिसर ट्रेनिंग कॉर्प्स’ (NJROTC) कार्यक्रमात तिची तब्बल ३०० नेव्ही कॅडेट्सच्या कमांडिंग ऑफिसरपदी निवड करण्यात आली आहे. या प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान होणाऱ्या मोजक्या विद्यार्थ्यांमध्ये रिद्धीचा समावेश झाला आहे.

रिद्धीने यापूर्वी NJROTC मध्ये अकॅडमिक ऑफिसर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. नेतृत्वगुण, शिस्त, उत्कृष्ट कामगिरी आणि समर्पित सेवेमुळे तिला कमांडिंग ऑफिसरची जबाबदारी देण्यात आली. या भूमिकेत ती कॅडेट्सचे नेतृत्व करणार असून प्रशिक्षण, शिस्त, परेड आणि विविध उपक्रमांचे नियोजन करणार आहे.

भविष्यात अमेरिकन नौदलात सेवा करण्याचे रिद्धीचे स्वप्न असून, या नियुक्तीमुळे तिच्या कारकिर्दीला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, देशसेवा आणि शिस्तीची भावना निर्माण करण्यासाठी ती विशेष प्रयत्न करणार असल्याचे तिने सांगितले.

रिद्धीने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबासह बीएपीएस स्वामीनारायण संस्थेकडून मिळालेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनाला दिले आहे. कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सेवाभाव यांच्या बळावर हे यश मिळाल्याचे तिने नमूद केले.

भारतीय वंशाच्या विद्यार्थिनीने अमेरिकेत मिळवलेल्या या यशाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, जगभरातील भारतीयांसाठी रिद्धी चौहान प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *