Pimpri-Chinchwad-शिक्षणाच्या मंदिरावर मध्यरात्री हल्ला! माणमधील शाळा पेटवून लाखोंची तोडफोड; जागेच्या वादातून संतापजनक प्रकार

कार्यालय फोडून संगणक, लॅपटॉप, सीसीटीव्ही जाळले; सहा वर्गखोल्यांची नासधूस, मुख्य आरोपी अटकेत; तिघांचा शोध सुरू

पिंपरी-चिंचवड : विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देणाऱ्या शाळेलाच लक्ष्य करत मध्यरात्री झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेने मुळशी तालुक्यातील माण परिसर हादरला आहे. जागेच्या जुन्या वादातून चौघांनी शाळेत घुसून कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, सीसीटीव्ही यंत्रणा आणि अन्य साहित्य जाळून टाकले. एवढ्यावरच न थांबता सहा वर्गखोल्यांमधील साहित्याचीही मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. या घटनेत सुमारे ५ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामकाजही विस्कळीत झाले आहे.
ही घटना मुळशी तालुक्यातील माण येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये रविवारी मध्यरात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी गणेश ज्ञानोबा पारखी (रा. माण, ता. मुळशी) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचे तीन साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. शाळेचे लिपिक बाळासाहेब लक्ष्मण माने (वय ५८) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील जय शिवराय प्रतिष्ठान संचलित ही शाळा पाचवी ते दहावीपर्यंतची आहे. येथे १२ शिक्षक आणि तीन शिपाई कार्यरत आहेत. शाळा उभारलेल्या जागेबाबत प्रतिष्ठान आणि आरोपी यांच्यात काही काळापासून वाद सुरू होता. या वादातूनच कट रचून ही तोडफोड केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
नेहमीप्रमाणे शनिवारी शाळा बंद करण्यात आली होती. रविवारी सुटी असल्याने परिसरात कोणीही नव्हते. सोमवारी सकाळी शाळेला आग लागल्याची माहिती मिळताच लिपिक बाळासाहेब माने घटनास्थळी पोहोचले. तेव्हा कार्यालयाचे पत्रे तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. कार्यालयातील संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, इन्व्हर्टर, सोलर सिस्टीम, सीसीटीव्ही यंत्रणा आणि इतर साहित्य जाळण्यात आले होते. देशभक्तांचे फोटोही फोडण्यात आले होते.

हल्लेखोरांनी त्यानंतर सहा वर्गखोल्यांमध्ये घुसून टेबल, खुर्च्या आणि इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. त्यामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणच उद्ध्वस्त झाले. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाला दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

शाळेसारख्या ज्ञानमंदिरावर झालेल्या या हल्ल्यामुळे पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. फरार आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याच्या महिला फौजदार राजश्री पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *