पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीररीत्या पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवार (दि. ३ मे) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील बस स्टॉप जवळ करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस हवालदार आशिष बनकर यांनी रविवारी (दि. ३ मे) रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक अशोक भंडारी (वय २७, रा. धनकवडी, पुणे) असे गुन्हा दाखल केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील बस स्टॉपजवळ एक तरुण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. अभिषेक याच्याकडे ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस विनापरवाना आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शस्त्र जप्त केले आहे. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
