बटाट्याची भाजी आवडली नाही म्हणून कामगाराला मारहाण

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – जेवणात बनवलेली बटाट्याची भाजी चांगली लागली नसल्याने दुसरी भाजी मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाने रंगकाम करणाऱ्या व्यक्तीला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. १३ जुलै) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राक्षेवाडी, चाकण येथे घडली.
रामनिवास बिलाश बरई (वय ४५, रा. मुंबई, मूळगाव उत्तर प्रदेश) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश यादव (वय २६) आणि धर्मेंद्र यादव (वय ३०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या राहत्या ठिकाणी असताना जेवणासाठी बटाट्याची भाजी बनवण्यात आली होती. भाजीची चव चांगली नसल्याने त्यांनी दुसरी चांगली भाजी खाण्यासाठी द्या, असे आरोपीला सांगितले. यावरून आरोपीने आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतले आणि भावाच्या चिथावणीवरून फिर्यादीला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या ओठांना गंभीर दुखापत होऊन टाके पडले असून, उजव्या हाताच्या तीन बोटांना आणि दातांना दुखापत झाली आहे. उत्तर चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *