Pimpri-Chinchwad-मोशी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना दिलासा; महापालिकेकडून १० लाखांच्या मदतीचे वितरण सुरू मृत अक्षय सावंत यांच्या वारसांच्या खात्यात पहिला हप्ता जमा; उर्वरित आठ कुटुंबीयांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
पिंपरी-चिंचवड :
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या कुटुंबीयांना जाहीर करण्यात आलेली प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत प्रत्यक्षात वितरित करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवात केली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर मृत अक्षय सावंत (वय ३२) यांच्या वारसांच्या खात्यात १० लाख रुपयांची मदत जमा करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
महापौर रवि लांडगे यांनी दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अक्षय सावंत यांच्या पत्नी हर्षदा सावंत यांच्या खात्यात ३४ टक्के, तर आई रेश्मा सावंत आणि वडील राजू सावंत यांच्या खात्यात प्रत्येकी ३३ टक्के रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
दरम्यान, मृत भावेश वाणी, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांच्या वारसांकडील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अंतिम टप्प्यात असून, प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही आर्थिक मदत जमा केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक आधार देण्याबरोबरच शहरातील सर्व कचरा व्यवस्थापन प्रकल्पांतील सुरक्षा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यात येत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्यात येणार आहेत.