पुणे :
भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत पुणे विभागात मोठी धडक कारवाई करण्यात आली. १४ जुलै रोजी पुणे, सांगलीसह विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत ८ लाख ३३ हजार ३९१ रुपयांचा भेसळीच्या संशयातील अन्नसाठा आणि २२ हजार ७८९ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. एकूण ८ लाख ५६ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
कारवाईदरम्यान सांगली जिल्ह्यात दूध भेसळप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तर पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील एका आस्थापनावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंक जप्त करण्यात आले. तपासादरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने संबंधित आस्थापनाला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले की, नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी राज्यभर ही विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत, स्वच्छतेबाबत किंवा भेसळीबाबत संशय असल्यास नागरिकांनी तातडीने १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त (अन्न), पुणे विभाग यांनी केले आहे.
