मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणणारी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
ही भेट अचानक झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेली ही बैठक नेमकी कोणत्या कारणासाठी झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या भेटीमागे राजकीय समीकरणे, स्थानिक विकासकामे की अन्य काही विषय होते, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यातील चर्चेचा अजेंडा अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नसला, तरी या भेटीमुळे आगामी राजकीय घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे. विशेषतः जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमुळे या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या भेटीवर सत्ताधारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, राज्याच्या राजकारणात या भेटीची चर्चा रंगली असून, पुढील काही दिवसांत यासंदर्भात अधिक खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
