Pimpri-Chinchwad-पावसाळा आला… घराघरांत हिरवाई फुलली!; पिंपरी-चिंचवडमध्ये डिझायनर कुंड्या आणि इनडोअर गार्डनिंगची वाढती क्रेझ

बाल्कनी ते टेरेस गार्डनचा नवा ट्रेंड; सेल्फ-वॉटरिंग कुंड्या, शोभेच्या वनस्पती आणि औषधी रोपांना मोठी मागणी

पिंपरी-चिंचवड :
पावसाळ्याची चाहूल लागताच पिंपरी-चिंचवडकरांनी घर सजविण्यासाठी हिरवाईची कास धरली आहे. शहरातील रोपवाटिकांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली असून, यंदा केवळ रोपेच नव्हे तर आकर्षक डिझायनर कुंड्यांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. फ्लॅट संस्कृती वाढल्याने बाल्कनी, टेरेस आणि घरातील कोपरे हिरवाईने सजविण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे ‘इन्डोअर गार्डनिंग’चा ट्रेंड शहरात चांगलाच बहरला आहे.

पिंपरी, चिंचवड, वाकड, हिंजवडी, रावेत, पिंपळे सौदागर आणि निगडी परिसरातील नर्सरीमध्ये सध्या ग्राहकांची मोठी वर्दळ आहे. सोशल मीडियावरील गार्डनिंग व्हिडिओ आणि होम डेकोरच्या नव्या संकल्पनांमुळे तरुणांसह नोकरदार वर्ग आणि गृहिणीही घरात छोटेखानी बाग तयार करण्यास प्राधान्य देत आहेत.

यंदा बाजारात बंगळुरूहून आणलेल्या फायबर, सिरॅमिक आणि टेराकोटा डिझायनर कुंड्यांना विशेष मागणी आहे. स्टोन फिनिश, टेक्श्चर डिझाईन, हँगिंग पॉट, उंच आणि चौकोनी आकारांच्या कुंड्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. व्यस्त जीवनशैली लक्षात घेऊन सेल्फ-वॉटरिंग कुंड्यांची विक्रीही वाढली आहे. या कुंड्यांच्या किमती ४०० रुपयांपासून ४ हजार रुपयांपर्यंत आहेत.

घराच्या सजावटीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचाही विचार करून नागरिक विविध प्रकारची रोपे खरेदी करत आहेत. मनी प्लँट, स्नेक प्लँट, अरेका पाम, पीस लिली यांसारख्या इनडोअर वनस्पतींना मोठी मागणी आहे. तुळस, कोरफड, गवती चहा यांसारख्या औषधी वनस्पतींसह रंगीबेरंगी फुलझाडांचीही विक्री वाढली आहे.

घरगुती वापरापुरतेच नव्हे, तर कार्यालये, कॅफे, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि आयटी कंपन्यांमध्येही आकर्षक कुंड्यांद्वारे हिरवाई निर्माण करण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवडमध्ये ‘ग्रीन होम’ आणि ‘स्टायलिश गार्डन’चा ट्रेंड जोर धरताना दिसत आहे. रोपवाटिका व्यावसायिकांच्या मते, पुढील काही आठवडे हा उत्साह कायम राहणार असून, पावसाळ्यात हिरवाईची ही बाजारपेठ आणखी बहरण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *