घरबसल्या कमाईच्या नादात बँक खाती भाड्याने देणे पडेल महागात
सोशल मीडियाच्या दुनियेत ‘घरबसल्या सोपी कमाई’ आणि ‘झटपट श्रीमंत होण्याचे’ आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्हेगारांचे सर्वात मोठे हत्यार ठरणाऱ्या ‘म्यूल बँक खात्यां’वर थेट प्रहार करण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन म्यूल हंट’ ही धडक मोहीम उघडली असून, त्याअंतर्गत शहरातील ५ वेगवेगळ्या संशयित खातेदारांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवघ्या काही हजार रुपयांच्या कमिशनच्या लालसेने स्वतःची बँक खाती, एटीएम कार्ड, नेट बँकिंगचे पासवर्ड आणि सिम कार्ड अनोळखी लोकांच्या हवाली करणारे तरुण व नागरिक नकळतपणे या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचे भागीदार बनत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.
शेअर मार्केटमधील बनावट गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट आणि पार्ट-टाइम जॉबच्या नावाखाली देशातील लाखो नागरिकांना लुटणारा सायबर माफिया कधीही स्वतःचे मूळ बँक खाते वापरत नाही. त्यासाठी ते टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवरून गरजू विद्यार्थी, बेरोजगार आणि कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना जाळ्यात ओढतात. त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे बनावट कंपन्यांची चालू खाती उघडली जातात आणि ठगीचा कोट्यवधी रुपयांचा पैसा या खात्यांमधून काही तासांतच परदेशात वळवला जातो. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एनसीपीआर आणि सामवाय पोर्टलवरून मिळालेल्या डेटाचे सखोल विश्लेषण करताना पिंपरी-चिंचवड परिसरातील ५ मुख्य खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे संशयित व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये चिंचवड येथील ‘जीनियस एंटरप्रायझेस’च्या खात्यात अवघ्या ११ दिवसांत ९३ लाख ६२ हजार रुपये, देहूरोड येथील अभिजित चव्हाण याच्या खात्यात ५४ लाख ६२ हजार रुपये, पिंपरीतील सागर साळवे याच्या खात्यात १६ लाख ९७ हजार रुपये, चिंचवड येथील राहुल राठोड याच्या खात्यात ३४ लाख ३७ हजार रुपये आणि थेरगाव येथील अवघ्या १९ वर्षांच्या प्रेम लोखंडे याच्या खात्यात २३ लाख २३ हजार रुपयांचे संशयित व्यवहार आढळले आहेत. या खात्यांविरोधात देशातील विविध राज्यांतून अनेक सायबर तक्रारी आधीच दाखल झालेल्या आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहीदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली सायबर आणि काळेवाडी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या मोहिमेचा मूळ उद्देश केवळ खाती सील करणे नसून, यामागील मुख्य एजंट, मास्टरमाइंड आणि पैशांचा मूळ स्रोत शोधून काढणे हा आहे. दरम्यान, कोणत्याही नागरिकाने कंपनीचे पैसे, गेमिंग फंड, जीएसटी रिफंड किंवा सीबील स्कोर वाढवून कर्ज देण्याच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे बँक खाते, पासबुक किंवा पासवर्ड कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.