Pimpri-Chinchwad-‘पोर्टर’साठी प्रवासी रिक्षा वापरल्यास खैर नाही!; आरटीओचा इशारा, नियमभंग करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई प्रवासी परवान्याच्या रिक्षांत मालवाहतूक बेकायदेशीर; चालकांसह संबंधित ॲप्सवरही होणार कठोर कारवाई
पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात प्रवासी ऑटोरिक्षांचा वापर मालवाहतुकीसाठी होत असल्याचे प्रकार वाढू लागल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ॲक्शन मोडमध्ये आले आहे. प्रवासी परवानाधारक रिक्षांमधून कोणत्याही प्रकारची व्यावसायिक मालवाहतूक केल्यास संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाईसह जप्तीची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आरटीओने दिला आहे.
आरटीओच्या निदर्शनास आले आहे की, काही रिक्षाचालक ‘पोर्टर’ आणि तत्सम ऑनलाइन मालवाहतूक ॲप्सवर आपल्या प्रवासी रिक्षांची नोंदणी करून माल वाहतूक करत आहेत. मात्र, प्रवासी वाहनांचा अशा प्रकारे व्यावसायिक वापर करणे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आरटीओच्या माहितीनुसार, प्रवासी परवाना असलेल्या रिक्षा केवळ प्रवाशांच्या वाहतुकीसाठीच वापरता येतात. मालवाहतुकीसाठी त्यांचा वापर करण्यास कायद्याने परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनाविरुद्ध मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. यामध्ये दंड, वाहन जप्त करणे तसेच वाहनाचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याचाही समावेश असू शकतो.
प्रवासी रिक्षांमधून मालवाहतूक केल्याने अपघाताचा धोका वाढतो. वाहनाची स्थिरता बिघडते. रस्ते सुरक्षेलाही धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे.
आरटीओने रिक्षाचालकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, प्रवासी रिक्षांची मालवाहतुकीसाठी नोंदणी करणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे शहरातील रिक्षाचालकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.