चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा मिक्सरच्या वायरने गळा आवळून खून केला. ही घटना १७ जुलै रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास चाकण येथील साईनगरमध्ये घडली.
बडीमा रफिक पठाण (वय २७) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. रफिक मेहबुब पठाण (वय ३२, रा. साईनगरी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मृत महिलेचे वडील मकबुल उस्मान नदाफ (वय ५२, रा. वाकी, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रफिक हा फिर्यादी यांची मुलगी बडीमा हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याच कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने घरात बडीमा हिचा मिक्सरच्या वायरने गळा आवळून खून केला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.