तब्बल ४४ गुन्ह्यांची नोंद असलेल्या अट्टल घरफोड्यासह टोळी गजाआड १० लाखांचा मुद्देमाल जप्त; वाकड पोलिसांची कामगिरी
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – सराईत गुन्हेगार, ज्याच्या नावावर तब्बल ४४ गुन्हे दाखल आहेत, अशा अट्टल घरफोड्याला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत त्याच्या तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून घरफोडीचे ५ गुन्हे उघडकीस आणत १० लाख ३४ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाकड येथील उत्कर्ष चौकात बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. खबरदाराकडून मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, अतुल ऊर्फ ‘आट्या’ चंद्रकांत आमले (वय ३०, रा. वारजे, पुणे) या सराईत गुन्हेगाराला इराणी कॅफे, वाकड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
मुख्य आरोपी अतुल आमले याच्यावर पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर आणि लातूर येथे मिळून तब्बल ४४ गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपीने दिलेल्या माहितीनंतर मोहन ऊर्फ आबा जनार्दन मुजमुले, भिमराव बाबुराव गंगावणे आणि रामेश्वर लिंबाजी उपल्ले या तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली.
ही कामगिरी वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, श्रीनिवास दराडे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली आहे.