Pune-‘संवाद वारी’ डिजिटल चित्ररथाला मंत्री आशिष शेलार व दत्तात्रय भरणे यांची भेट; एआय तंत्रज्ञानाधारित उपक्रमाचे कौतुक
पुणे : प्रतिनिधी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आषाढी वारीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘संवाद वारी’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला इंदापूर तालुक्यातील बेलवडी येथे राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सदिच्छा भेट दिली. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान त्यांनी डिजिटल चित्ररथातील आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची पाहणी केली.
यावेळी दोन्ही मंत्र्यांनी राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल सादरीकरणाचा आढावा घेतला. तसेच चित्ररथामध्ये उपलब्ध असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित चॅटबॉट प्रश्नमंजूषेचा अनुभव घेत शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती जाणून घेतली.
मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, पारंपरिक वारीसोबत आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची सांगड घालत शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम आहे. ‘संवाद वारी’ ही नागरिकांशी प्रभावी संवाद साधणारी संकल्पना असून, डिजिटल माध्यमांचा वापर करून शासनाच्या योजना अधिक सुलभ, आकर्षक आणि परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत वारीसारख्या मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी डिजिटल चित्ररथ अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. एआयसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना त्वरित आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, उपस्थित वारकरी, भाविक आणि नागरिकांनी डिजिटल माहिती, दृश्यफिती तसेच एआय चॅटबॉटच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.